जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना विषाणू संसर्गाचा जिल्ह्यात आतापर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. मात्र प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात दर बुधवारी अपंगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता ही तपासणी 31 मार्च, 2020 पर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी घेतला आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचेशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून आढावा घेतला. या आढाव्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सर्व संबंधित यंत्रणेची बैठक घेऊन उपस्थितांना वरीलप्रमाणे सूचना केल्यात. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ किरण पाटील यांचेसह जिल्हा परिषद, महानगरपालिका व आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये याकरीता जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहे. तथापि, जगभरात या विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता अधिक प्रतिबंधात्मक उपाय योजण्याची गरज असल्याने गर्दी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे. अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दर बुधवारी नागरीकांची तपासणी करण्यात येते. यासाठी जिल्हाभरातील ग्रामीण भागातून नागरीक येत असतात. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयातही नागरीक आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी येतात. परंतु कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठी आता नागरीकांना कार्यालयात येण्याची गरज नसून ते त्यांच्या अडचणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या collector.jalgaon@maharashtra.gov.in या मेलवर पाठवू शकतील. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरीकांच्या अडचणींना त्यांच्या मेलवरच उत्तर देण्यात येईल असेही जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सांगितले. तसेच जिल्हा परिषद व महापालिकेनेही हीच पध्दत अवलंबण्याची सूचना त्यांनी बैठकीत दिली. त्याचबरोबर नागरीकांनी तूर्तास धार्मिक व पर्यटरस्थळांना जाणे टाळावे. असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.