नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूच्या साथीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर तिरुपती बालाजी मंदिर उघडण्याची तयारी सुरु झाली आहे. यासाठी राज्य सरकारने तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टला मंदिर उघडण्याची परवानगी दिली आहे. या संदर्भात तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, तिरुपती बालाजी मंदिर परिसर सुरुवातीपासूनच ग्रीन झोनमध्ये आहे. सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने लॉकडाऊनमध्ये मंदिर बंद करण्यात आले होते. भगवान वेंकटेश्वर हे आपले पालनहार आहेत आणि संकट काळात आपले रक्षण करतील.
आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच तिरुपती बालाजी मंदिर बंद करण्यात आले होते. कोरोना साथीमुळे हे मंदिर 20 मार्च पासून बंद करण्यात आले होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, मंदिर उघडल्यानंतर भाविकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. यासाठी मास्क आणि हातमोजे अनिवार्य असतील. तसेच, प्रत्येकाला थर्मल स्क्रीनिंगही करावी लागेल. याशिवाय सर्वांना सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल.
मात्र, पूर्वीप्रमाणे दर्शनासाठी लोकांची गर्दी कमी असेल असेही सुब्बारेड्डी यांनी सांगितले. रेड्डी यांनी भर देऊन सांगितले की, ग्रुपमध्ये दर्शन घेणाऱ्यांना परवानगी देण्यात येणार नाही. यासाठी त्यांना मंदिराच्या नवीन नियमांचे पालन करावे लागेल. भाविकांना टप्प्याटप्प्याने दर्शनासाठी जाण्याची परवानगी देण्यात येईल. भाविकांना दर्शनापूर्वी आणि दर्शनानंतर त्यांना सॅनिटाइज करण्यात येईल.
दरम्यान, चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये मंदिरे आणि मशिदी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर लॉकडाऊन अनेक राज्यात शिथिल करण्यात आले आहे. असू असूनही धार्मिक ठिकाणं उघडण्यास परवानगी अद्याप देण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत 1 जून नंतर तिरुपती बालाजी मंदिर उघडले जाण्याची शक्यता आहे.