वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) – भारत जगातील कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट असलेल्या देशांपैकी एक आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतात सध्या 1 लाख 38 हजार 845 कोरोनाचे रुग्ण आहेत. तर 4 हजार 24 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांच्या आकड्यात आता भारताने इराणला मागे टाकत पहिल्या -10 देशांमध्ये स्थान मिळवले आहे.
दरम्यान मिशिगन युनिव्हर्सिटी आणि जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनं कोरोना मॉडेलद्वारे चेतावणी दिली आहे की, जुलैच्या पहिल्या आठवड्यात भारतात 21 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. अशा परिस्थितीत सरकारच्या अडचणी वाढू शकतात. तर लॉकडाऊनचे नियम आणखी कडक होऊ शकतात. मिशिगन युनिव्हर्सिटी ऑफ बायोस्टॅटिस्टिक्सचे आणि रोग तज्ज्ञ भ्रमर मुखर्जी यांनी एका एजन्सीला याबाबत सांगितले.
भारतातील परिस्थिती येत्या काळात आणखी गंभीर होऊ शकते, अशी माहिती तयार केलेल्या मॉडेलच्या मध्यमातून देण्यात आली आहे. भ्रमर मुखर्जी यांनी सांगितेले की, भारतात अद्याप संसर्गाचे प्रमाण कमी झाले नाही. सरकारी आकडेवारीनुसार भारतात कोरोनाची प्रकरणं 13 दिवसांनी दुप्पट होत आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊनमध्ये शिथिल करण्यात आलेले नियम अडचण वाढवू शकतात.
भारतात सरकारी आकडेवारीनुसार देशातील रुग्णालयात सध्या 7 लाख 14 हजार बेड आहेत. तर 2009 मध्ये ही संख्या 5 लाख 40 हजार होती. संसर्गाच्या संख्येत पहिल्या 10 देशांमध्ये अमेरिकेचा पहिला क्रमांक आहे. यानंतर ब्राझील, रशिया, ब्रिटन, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि तुर्की या देशांचा क्रमांक लागतो.