न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या मुद्यावरुन चीन जगातील सर्वच राष्ट्रांच्या रडारवर आले आहे. त्यातच आता अमेरिकेने याच मुद्यावरून चीनला कोंडीत पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.त्यासाठी अमेरिका इतर राष्ट्रांना आपल्या बाजून वळवण्याचे प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे. चीनच्या वुहानमध्ये कोरोना विषाणूची उत्पती झाली. या विषाणूची उत्पती कशी झाली? याचे उत्तर चीनने द्यायला हवे, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी म्हटले आहे. इतर देशांना एकत्रित करुन चीनवर दबवा टाकण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.
कोरोना विषाणूच्या मुद्यावर दुसऱ्या राष्ट्रांशी चर्चा सुरु आहे. या विषाणूची उत्पती ही चीनच्या वुहान शहरात झाली हे आम्ही इतर राष्ट्रांना सांगत आहोत. विषाणूसंदर्भात निर्माण होणाऱ्या उकल ही चीनने सर्वांसमोर करायला हवी,असेही माइक पोम्पियो यांनी म्हटले.
तसेच, डिसेंबर 2019 मध्येच चीनमध्ये या विषाणूची पुष्टी झाली. चीनमधून देशभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने अमेरिकेत थैमान घातले असून याठिकाणी मृतांचा आकडा वाढत असून अर्थकारणावरही याचे विपरित परिणाम जाणवत आहेत. जगभरात घोंगावत असलेल्या संकटाला चीन जबाबदार आहे, असेही ते म्हणाले. कोरोना विषाणूमुळे अमेरिकेतीलच नव्हे तर जागतिक अर्थकारण कोलमडले आहे. यासंदर्भातील रणनितीवर आम्ही इतर देशांशी चर्चा करत आहोत. जागतिक व्यापार पूर्ववत सुरु करण्याच्या दृष्टीनेही योग्य ती पावले उचलली जातील, असेही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केले.