मुंबई (वृत्तसंस्था) – दारू पिऊन बायकोशी भांडण झाल्याने एका माणसाने तिची हत्या केल्याची घटना मध्यप्रदेशात घडली आहे. तिची हत्या केल्यानंतर त्याने स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. हा माणूस महिलेचा सातवा नवरा असल्याची माहिती मिळत आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशच्या बालाघाट येथे ही घटना घडली. या घटनेतील आरोपीचं नाव लोकराम असं आहे. दहा वर्षांपूर्वी लोकरामचं या महिलेशी लग्न झालं होतं. महिला त्याची दुसरी बायको होती आणि लोकराम तिचा सातवा नवरा होता. बुधवारी रात्री लोकराम दारू पिऊन घरी आला. त्याचं त्याच्या बायकोशी कडाक्याचं भांडण झालं. त्याने रागाच्या भरात आपल्या बायकोची हत्या केली. आणि त्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली.
गुरुवारी दुपारपर्यंत या घटनेचा कुणालाही पत्ता लागला नव्हता. गुरुवारी दुपारी तिथून काही अंतरावर राहणारा या दांपत्याचा मुलगा त्यांच्या घरी आला. त्याने दार वाजवूनही कुणीही दार उघडलं नाही, म्हणून त्याने शेजाऱ्यांच्या मदतीन दरवाजा तोडला. तेव्हा त्याला त्याच्या आई वडिलांचे मृतदेह दिसले. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.