नगर (वृत्तसंस्था) – कल्याण रस्त्यावरील नेप्ती शिवारात सव्वा महिन्यापूर्वी एका पुलाच्या मोरीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तीचा गळा आवळून खून झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी तब्बल 35 दिवसांनंतर गुन्ह्याचा छडा लावून एका आरोपीस जेरबंद केले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रघुनाथ एकनाथ बर्डे (रा. नालेगाव, नगर), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बर्डे यांच्या खून प्रकरणी मच्छिंद्र बाबुराव म्हस्के (वय-45, रा. बुरुडगाव, नगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सिंह यांनी दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकरसिंह राजपूत आदी उपस्थित होते.
पोलिसांनी घरातून निघून गेलेल्या व्यक्तींची माहिती घेतली असता, नालेगावातील रघुनाथ बर्डे हे घरातून निघून गेल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी तो नंदा बर्डे यांना दाखवला. मात्र त्यांनाही मृताची ओळख पटू शकली नाही. त्यानंतर पोलीस प्रशासनाने डीएनए तपासून मृताची ओळख पटविली. शवविच्छेदन अहवालात गळा आवळून खून झाल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांना मच्छिंद्र म्हस्के हा रघुनाथ बर्डे याच्याबरोबर असल्याचे समजले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. आरोपीची चौकशी केली असता, त्यानेच खून केल्याचे पुढे आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मागर्दर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकरसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत, धनराज जारवाले, पोलीस बापूसाहेब फोलाने, रावसाहेब खेडकर, अशोक मरकड, राहुल शिंदे, बाळू कदम, प्रमिला गायकवाड, ज्ञानेश्वर खिळे, धर्मराज फहिफळे यांच्या पथकाने आरोपीस जेरबंद केले.