पुणे (वृत्तसंस्था) – राजगुरूनगर नगरपरिषदेचा पंचवार्षिक कालावधी संपुष्टात आल्याने आता नगरपरिषदेवर प्रशासक नेमण्यात आले आहे. प्रशासकीय अधिकारीपदी खेडचे प्रांताधिकारी संजय तेली यांची निवड झाली असल्याची माहिती मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी दिली.
करोना विषाणू संसर्गामुळे राजगुरूनगर नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक पुढे ढकलली आहे. 15 मे 2020 रोजी नगरपरिषदेच्या नगरसेवकांचा कालावधी संपला. या पाच वर्षांच्या काळात राजगुरूनगर शहराची पाणी आणि गटार या दोन मोठ्या योजना सुरू असून यातील पाणी योजना अंतिम टप्प्यात आहे तर गटार योजनेला सुरुवात झाली आहे. दरम्यान करोना संसर्गजन्य रुग्ण संख्या वाढल्याने देशासह राज्यात तब्बल दोन महिन्यापासून लॉकडाऊन झाले आहे. त्यामुळे या दोन्ही योजनेची कामे रखडली आहेत. त्यातच मजुरी काम करणारे परप्रांतीय मजूर त्यांच्या गावी गेल्याने या योजना रखडल्या आहेत.
नगरसेवकांचे अधिकार आता संपुष्टात आल्याने विकासकामांची गती कमी होणार आहे. तथापि ही कामे मार्गी लागण्यासाठी नगरपरिषदेकडे कार्यकाल पूर्ण केलेले नगरसेवक मागणी करीत आहेत. तर काही नगरसेवकांनी नगरपरिषदेकडे पाठ फिरवली आहे. नगरपरिषदेवर नव्याने नियुक्ती झालेले प्रशासक प्रांताधिकारी संजय तेली यांनी कार्यभार हाती घेतला असून रखडलेल्या कामांना गती देण्याचे त्यांनी जनतेला आश्वासन दिले आहे.