मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 52 झाली आहे, तर देशात १७०हून अधिक रुग्ण आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सरकारकडून राबवण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गरज पडल्यास संपूर्ण राज्यात सरकारी कर्फ्यू जारी करावा, असे आवाहन सरकारला केले आहे.
राजू पाटील यांनी ट्विट केले आहे की,’महाराष्ट्राची #Italy होऊ द्यायची नसेल,आणि जर जनतेला केलेले ‘स्वयंशिस्ती’ चे आवाहन काम करणार नसेल तर सरकारला कठोर निर्णय घ्यावेच लागतील. गरज पडल्यास संपूर्ण राज्यात ‘सरकारी कर्फ्यू’ जाहीर करावा. असं ही त्यांनी म्हंटले आहे.दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यध्य राज ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे मनसेच्या कार्यकर्त्यांना कोरोनाबाबत विविध सूचना दिल्या आहे. यामध्ये राज ठाकरे म्हणाले की, आतापर्यंत आपण कोरोनाला जास्त फैलावू न देण्यात यशस्वी झालो आहोत. कोरोना एकमेकांच्या सहवासातून होतो. म्हणून आपण जर कमी वेळा एकमेकांच्या जवळ गेलो आणि हे सुमारे दोन आठवडे केले तर हा रोग पसरणार नाही असे राज ठाकरेंनी सांगितले आहे.