मालेगाव (वृत्तसंस्था) – आज सकाळी साडे आठला संचारबंदीत पोलिसांनी एका युवकाला हटकले. त्याला काठी मारून परत पाठवल्याने संतप्त झालेल्या जमावाकडून शहरातील अय्युबी चौकात पोलिस केंद्राची तोडफोड करण्यात आली. यावेळी अतिशय जलदगतीने तेथे राज्य राखीव दलाचे वाहन दाखल झाल्याने जमाव पांगला व स्थिती नियंत्रणात आली.
सकाळी साडे आठला एक युवक दूध घेण्यासाठी गेला होता. यावेळी संचारबंदी व सोशल डिस्टन्सचे उल्लंघन झाल्याने पोलिसांनी त्यांला समज दिली. शाब्दिक वाद झाल्याने पोलिसांनी या युवकाला काठीने फटका मारला. हा युवक परतताना तो जखमी झाल्याची चर्चा सुरु झाली. ती अफवा परिसरात पसरल्याने संतप्त जमाव अल्लामा एकबाल पुलाजवळ असलेल्या पोलिस केंद्राकडे गेला. जमाव मोठा असल्याने बंदोबस्तावर असलेले पोलिस त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी इशारा देत होते. जमाव मोठ्या प्रमाणात आरडाओरडा करीत असल्याने पोलिस तेथून मागे सरकत होते. याचवेळी राज्य राखीव दलाचे वाहन जवानांसह तेथे दाखल झाले. त्यानंतर हा जमाव मागे सरत निघून गेला व स्थिती नियंत्रणात आली. मात्र या घटनेने शहरात गोंधळ उडाला.
दरम्यान या घटनेनंतर तातडीने वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थितीचा आढावा घेतला. अय्युबी पुलावर जादा कुमक तैनात करण्यात आली. पोलिस उपअधिक्षक रत्नाकर नवले, वरिष्ठ निरीक्षक मंगेश चव्हाण आदींनी स्थितीचा आढावा घेतला.