नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता भाजप खासदार आणि भोजपुरी स्टार मनोज तिवारी यंनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मनोज तिवारी यांनी सोमवारी सुशांत सिंह राजपूपतच्या पटण्यातील घरी जाऊन कुटुंबीयांचाी भेट घेतली आणि आपल्या संवेदना व्यक्त केल्या.
एका मुलाखतीत बोलताना मनोज तिवारी यांनी बॉलिवीडमधील घराणेशाही आणि भाई जातिवाद हा मुद्दा उचलून धरत सुशांतही याचीच शिकार झाला आहे असे म्हटलं आहे. मनोज तिवारी म्हणाले, ‘जेव्हा एका लहान शहरातील मुलगा बॉलिवूडमध्ये जातो तेव्हा त्याच्यासाठी एकदम उलट स्थिती निर्माण होते. अशात जर तुम्ही आपल्या कामानं स्वत:ला स्थापित करत असाल तर अनेक शक्ती तुम्हाला रोखू लागतात. कमी वयात आईला गमावल्यानंतरही सुशांत एवढा विचलित झाला नव्हता. परंतु मोठा प्रश्न हा आहे की, असं काय झालं की, सुशांत विचलित झाला होता.’
पुढे बोलताना सीबीआय चौकशीची मागणी करत तिवारी म्हणाले, ‘सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी भाई जातिवादावरून जे आरोप होत आहेत त्याची तळाला जाऊन चौकशी झाली पाहिजे. जे कोणी या प्रकरणी दोषी असतील त्यांना शिक्षा मिळायला हवी. कुटुंबीय देखील सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. मलाही वाटतं की, महाराष्ट्र सरकारनं या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी सीबीआयकडे द्यायला हवी.’