पुणे (वृत्तसंस्था) – वाठार स्टेशन, ता. कोरेगाव येथील श्री स्वामी पेट्रोल पंपाजवळ ह्युंदाई कार आणि मोटारसायकल (एमच-11-बीआर-3661) यांची समोरासमोर धडक होऊन बिचुकले, ता. कोरेगाव येथील शेतकरी कुटुंबातील दत्तात्रय संपत पवार (वय 50) हे जागीच ठार झाले. अपघातानंतर मद्यधुंद कारचालक धनंजय जाधव (रा. खेड, सातारा) याने पळून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु वाठार स्टेशन पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. या कारवर नंबरप्लेट नव्हती.

याबाबत माहिती अशी, लोणंद-सातारा रस्त्यावर वाठार स्टेशनकडून निघालेली मोटारसायकल व देऊरकडून येणारी नवी हुंदाई कार यांची वाठार स्टेशन येथील पेट्रोल पंपाजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातात मोटारसायकलस्वार दत्तात्रय पवार यांच्या छातीत मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. अपघाताची खबर मिळताच सपोनि स्वप्निल घोंगडे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या अपघातामुळे रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील तपास करत आहेत.







