मुंबई (वृत्तसंस्था) – दरोडेखोर असल्याच्या संशयावरून पालघर येथे दोन साधू व त्यांचा मोटारचालक अशा तिघांची हत्या केल्याप्रकरणी 110 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तर हल्ला करणारे व ज्यांच्यावर हल्ला झाला या पैकी कुणीही वेगळ्या धर्माचे नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणावरून समाजात आणि समाज माध्यमांतून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलीस व सायबर सेलला कठोर कारवाईचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.पालघर येथील या घटनेचा देशभरातून तीव्र निषेध होत आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करुन सांगितले आहे.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, पालघरची घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेचं राजकारण करु नये. उच्चस्तरीय चौकशी सुरू असून आतापर्यंत 110 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील नऊजण अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. कुणीही या घटनेचे विवाद करुन सामाजिक/जातीय तेढ निर्माण करू नये, यासाठी सरकार लक्ष ठेऊन आहे, या प्रकरणावरून समाजात आणि समाज माध्यमांतून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलीस व सायबर सेलला कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.आपल्या गुरुचे निधन झाले म्हणून त्यांच्या अंत्यविधीसाठी सुशील गिरी महाराज (35), चिकणे महाराज (70) आणि चालक नीलेश तेलगडे (30) हे तिघेजण मुंबईतील कांदिवलीहून इको कारने सूरतकडे निघाले होते. त्यांच्याकडे कोणताही पास नसल्याने चारोटी टोलनाका येथे पोलिसांनी त्यांची मोटार माघारी पाठवली. परंतु, त्यांना कोणत्याही परिस्थितीत सूरत गाठायचे होते म्हणून ते माघारी फिरून वाट वाकडी करून विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे दादरा नगर हवेलीच्या हद्दीवर असलेल्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे रात्री साडेनऊच्या सुमारास पोहचले. मात्र, त्याठिकाणी वनविभागाच्या चौकीजवळ असलेल्या जमावाने या तिघांची गाडी अडवली आणि त्यांना दरोडेखोर समजून दगड, कोयते, काठ्यांनी मारण्यास सुरुवात केली. त्यांच्यासह त्यांची कार पलटी केली. तेथे असलेल्या गार्डने प्रसंगावधान राखून पोलिसांना सूचना दिली. त्यामुळे तात्काळ साडेदहाच्या सुमारास पोलीस आपल्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या तिघांना कारमध्ये बसवून जखमी अवस्थेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव शेकडोंच्या संख्येने असल्याने त्यांच्यापुढे चार पोलिसांचे काहीच चालले नाही. यावेळी पोलिसांबरोबर असलेल्या जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी यांनीही जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना आपल्या गाडीत बसवले.मात्र, त्यानंतर जमाव अधिक आक्रमक झाला आणि गाडीबरोबर पोलिसांवरही हल्ला चढवला. या घटनेतून पोलीस कसेबसे बचावले, परंतु त्या तीन जणांची जमावाने पोलिसांच्या गाडीतच दगड, काठ्या, कोयत्याने वार करुन निर्घृण हत्या केली.या घटनेबाबत राष्ट्रीय स्तरावर उलट-सुलट बातम्या आल्याने तसेच समाज माध्यमांमधून चुकीचे व दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करू शकतील, अशा अशयाचे मेसेज फिरू लागल्यानंतर मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी त्याबाबत तातडीने वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पालघर हत्याकांडाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पालघरला घडलेली घटना ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असून त्याबाबत उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.