मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुण्यातील जिम, स्वीमिंग पूल, व्यायामशाळा, चित्रपटगृहं, नाट्यगृहं तात्पुरते बंद ठेवण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. मुंबई आणि पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना उद्धव ठाकरे यांनी या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारनं घेतलेल्या खबरदारींच्या उपायांची माहिती सभागृहाला दिली. पुण्यात आतापर्यंत कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानं पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शाळा बंद ठेवण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी मुंबईमधल्या शाळांबद्दल निर्णय अजून घेतला नसल्याचंही त्यांनी सांगितलं.शाळा आणि महाविद्यालयाच्या परीक्षांचं वेळापत्रक पुढं ढकलण्याबद्दल विचार करत असल्याचं त्यांनी म्हटलं. आपल्याकडे कोरोनाचे रुग्ण आता सापडत आहेत. अशावेळी पुढचे काही दिवस काळजी घेण्याची आवश्यकता असल्यानं परीक्षा आधी घेण्याऐवजी उशीरा घेतल्या जातील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. रेल्वे आणि बस या अत्यावश्यक सेवा असल्यानं बंद ठेवल्या जाणार नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.