मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने घातलेल्या निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या व रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, रस्त्यांवर अकारण दिसणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील. तसेच गरज पडल्यास राज्यात संचारबंदीही लागू केली जाईल.
घराबाहेर पडून रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांमुळे कोरोनाची साथ पसरण्याचा धोका वाढला आहे. रस्त्यावर गर्दी करणाऱ्या मोजक्या ‘निर्बुद्धां’मुळे राज्यातील जनतेच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. राज्य शासनाने आतापर्यंत संयमाने घेतले, परंतु हा संयम कायम ठेवणे यापुढे शक्य नाही. बंदी आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणारच, असा असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले. ‘कोरोना’ची साथ पसरु नये यासाठी शासन आवश्यक सर्व पावले उचलेल, परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण राज्यात संचारबंदीचा निर्णय घेतला जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.तसेच विलगीकरण केलेल्या संशयितांनी निर्बंध मोडून लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करु नये. तसे केल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल करुन कारवाई करु, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.