मुंबई (वृत्तसंस्था) – जगभरामध्ये करोना विषाणूमुळे भितीचे सावट आहे. अशात महाराष्ट्रामध्ये करोनाचे 14 रुग्ण आढळले आहेत. ‘राज्यातील एका वयोवृध्द रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. तर इतर सर्व रुग्णांची प्रकृती चांगली आहे.’, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर शाळांच्या सुट्टीबाबत लवकरच निर्णय घेऊ असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. करोना विषाणूसंदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
करोना विषाणूमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मात्र कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. सर्वांनी एकत्र येत करोनाशी लढा देऊ, असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. तसेच, घाबरु नका, सतर्क रहा आणि सरकारला सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. राज्यात करोनाचे 14 रुग्ण आढळले आहे. पुण्यामध्ये 9, मुंबईत 3, नागपूरमध्ये 1 आणि ठाण्यामध्ये 1 करोनाचा रुग्ण आढळला आहे.
दरम्यान, जर करोनाशी संबंधित लक्षणे आढळली तर त्वरीत डॉक्टरांकडे जा. वैयक्तीक स्वच्छता पाळा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. तसंच, परदेशातून आलेल्या नागरिकांशी संपर्क टाळा. सरसकट करोनाची टेस्ट करण्याचा आग्रह नको, असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. करोनाशी लढण्यासाठी राज्य सरकार सतर्क असून रुग्णांची टेस्ट मोफत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.