नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कॉंग्रेसचा राजीनामा दिलेले मध्यप्रदेशातील नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी कठोर टीका केली आहे. त्यांनी केवळ वडिलांच्या पुण्याचे राजकारण केले आहे. ज्योतिरादित्य हे जनसमूहाचे नेते नाहीत. त्यांच्याकडे संघटन कौशल्य नाही आणि ते चांगले प्रशासकही नाहीत असे प्रशांत किशोर यांचे म्हणणे आहे. प्रशांत किशोर त्यांनी भारतीय जनता पक्षावरही टीका केली आहे. ज्योतिरादित्य कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यामुळे कॉंग्रेसचे मोठे नुकसान झाले असल्याचे भारतीय जनता पक्षाने नेते सांगत आहेत. भाजपा केवळ सिंधिया या नावामुळे राजकारण करीत असलेल्या ज्योतिरादित्य यांना मोठे महत्त्व देत आहे असे त्यांनी म्हटले. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे सिंधिया या नावाशिवाय दुसरे काहीही नाही. त्यांना लोक ओळखत नाहीत. त्यांना राजकीय संघटन कौशल्य नाही आणि त्यांना प्रशासनाचा शून्य अनुभव असल्याचे किशोर यांनी म्हटले आहे. ज्योतिरादित्य सिंधिया हे ग्वाल्हेर येथील सिंधिया राजघराण्यातून आलेले आहेत. त्यांचे वडील माधवराव सिंधिया कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्याचबरोबर या राजघराण्यातील अर्धा डझन लोक राजकारणात आहेत. ते यापूर्वी गुन्हा मतदारसंघातून संसदेची निवडणूक जिंकले होते. मात्र गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत यांचा याच मतदारसंघात पराभव झाला आहे. भाजपा प्रशासित कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरू येथे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी एकनिष्ठ असलेले 17 आमदार विशेष विमानाने रवाना झाले होते. त्यानंतर सोमवारी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेसचा राजीनामा दिला आहे. अशा आशयाचे पत्र त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवून दिले आहे. या पत्रात ज्योतिरादित्य सिंधिया म्हणतात की मी 18 वर्षांपासून कॉंग्रेसचा प्राथमिक सदस्य होतो. मात्र आता काळानुरूप पुढे वाटचाल करण्याची गरज आहे. दोन वर्षापासून मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना कॉंग्रेसमध्ये समाजसेवा करणे अवघड झाले होते. त्यामुळे मी या विषयावर विचार करत होतो. आता त्यावर निर्णय घेण्याची वेळ आली होती. त्यामुळे मी आता कॉंग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे असे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत त्यानी ट्विटरवर टाकली आह.े त्या अगोदर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आपल्याला सुरुवातीपासूनच मध्यप्रदेशातील जनतेची आणि देशाची सेवा करायची होती. कॉंग्रेसमध्ये राहून ते शक्य होत नसल्यामुळे मी आता कॉंग्रेस सोडत आहे. आज मध्यप्रदेशातील कॉंग्रेसच्या 21 आमदारांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. हे आमदार भारतीय जनता पक्षात सामील होण्याची शक्यता आहे. तूर्तास तरी ज्योतिरादित्य शिंदे यांना राज्यसभेचे तिकीट दिले जाणार असल्याचे वृत्त आहे.