पारोळा (प्रतिनिधी) – ‘सवंग लोकप्रियता …’ ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर अनेकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. पारोळा येथील क्रियाशील नगराध्यक्ष करण पवार यांनी मोबाइलवर संपर्क करुन अगदी योग्य विषयाला समाजासमोर आणले असे मत मांडले. त्यांनी परखडपणे त्यांनी म्हटले की, ‘गल्लीबोळात अनावश्यक फिरणाऱ्या लोकप्रतिनिधींना कलेक्टरांनी घरातच थांबवायला हवे. नगरसेवक गल्लीत फिरतो म्हणून कार्यकर्ते व लोक गल्लीत फिरतात. आमदार, नगराध्यक्ष शहरात फिरतो म्हणून नागरिक शहरात फिरतात. लोक अनुकरण करतात. त्यातून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक आहे. म्हणूनच अगोदर पुढाऱ्यांना सक्तीने घरात थांबवा असे म्हणायची वेळ आहे. करण पवार पुढे म्हणाले, ‘मी स्वतः नगराध्यक्ष आहे. आम्ही, आमचे मुख्याधिकारी सरकारच्या सर्व सूचना पाळतो आहोत. शहरात फवारणी करीत आहोत. महत्त्वाच्या बैठका घेत आहोत. पण तेथे अनावश्यक गर्दी नाही की सोशल मीडियात फोटो नाही. काम नसेल तेव्हा मी स्वतः घरातच थांबून आहे. तेथूनच आढावा घेत आहे. शहरात जेथे नागरिकांची संख्या जास्त असेल तेथेच रसायन फवारत आहोत. गल्लीबोळात फवारणी करा असे सरकारही म्हणत नाही व तशी गरज नाही.’ करण पवार पुढे म्हणाले, ‘कोणताही पुढारी म्हणजे जादूगार नाही. त्याला बाहेर भटकून व्हायरसचा संसर्ग होणारच नाही असे नाही. उलट अशा लॉकडाऊन स्थितीत लोक आपले अनुकरण करणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. मी स्वतः पत्रकारांना विनंती केली की आता पुढाऱ्यांना घरात बसवायला बातमी छापा. कधीकधी कठोर होणे आवश्यक आहे.’