कराची (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. शेजारील राष्ट पाकिस्तानात पाकिस्तानात देखील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. पाकिस्तानात आतापर्यंत ७ हजार ४०० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १४३ जणांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांना वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई) किट उपलब्ध नसल्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. मात्र, पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गेल्या ४९ दिवसात पाकिस्तानच्या कराची शहरात ३ हजार २६५ मृतदेह कराची शहराच्या स्मशानभूमीत पुरल्याची बातमी समोर आली आहे. या संदर्भात द ट्रिब्यूनच्या वृत्तपत्राच्या अहवालानुसार कराची प्रशासनाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. यापूर्वी पाकिस्तानातील माध्यमांनी असे वृत्त दिले होते कि, कराची रुग्णालयात अनेक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मात्र, प्रशासन सर्वसामान्य जनतेपासून आकडे लपवण्याचा प्रयत्न करीत आहे. द ट्रिब्यूनच्या वृत्तपत्राच्या अहवालानुसार कराची शहरातील प्रसाशनाला यासंदर्भात विचारले असता त्यांनी उत्तर दिले नाही. तर पाकिस्तान सरकारने हे आकडे खोटे असल्याचं सांगितले आहे. मात्र, कराची महानगरपालिकेने मृतांचा आकडा जाहीर केला आहे. दरम्यान, भारतात मागील १२ तासात ५४३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोना बाधितांचा आकडा १४ हजारांपेक्षा जास्त आहे. मागील २४ तासात देशात ९९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर, ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर, देशभरात कोरोना संक्रमित रूग्णांची एकूण संख्या 14,378 झाली आहे. तर, १ हजार ९९२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्नालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत देशात ४८० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.