मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्रात कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आणखी तीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. तर नवी मुंबईमध्ये कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या 37 वर पोहचली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी ही माहिती दिली.चीनच्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरात भितीचे सावट आहे. रविवारपर्यंत भारतामध्ये कोरोनाबाधितांची संख्या 107 वर पोहचली. भारतातील कोरोनाबाधितांची सर्वात जास्त संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 37 रुग्ण आढळले असून पुण्यात सर्वाधिक 16 रुग्ण आहेत. या सर्वांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.