नंदुरबार (वृत्तसंस्था) – कोरोनाचा एकही रुग्ण अद्याप आढळुन आलेला नाही. ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. मात्र नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात पोटाचे दोन वेळचे खळगे भरण्याची चिंता आदिवासी बांधवांना सतावत आहे. हाताचे काम गेल्याने हजारो स्थलांतरीत मजुर आपल्या घरी तर परतले. मात्र खिशात दमडी नसल्याने मायबाप सरकारचे राशन मोफत मिळणार याच आशेवर आत जगण्याचे चक्र सुरु आहे. आदिवासी बहुल जिल्हा म्हणुन नंदुरबारची ओळख. रोजगाराच्या शोधात नंदुरबार जिल्ह्यातुन हजारो बांधव महाराष्ट्रसह गुजरात राज्यात स्थलांतरीत होत असतात. कोरोनाच्या सावटामुळे सध्या हजारो आदिवासी बांधव काम नसल्याने आपल्या घराकडे परतले आहे. शहरात रोजगार मिळत नसल्याने जगावे कसे हा प्रश्न पडल्याने गावाकडे शकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत हजारोंनी घर गाठली. मात्र त्यातही गावातल्या आपल्या लोकांनी वैद्यकीय तपासणीखेरीज गावात प्रवेश दिला नाही. गावागावात तैणात करण्यात आलेल्या ग्राम रक्षक दलाच्या युवकांनी गावाचे प्रवेशद्वारच सीलबंद करुन घेत त्यावर कडक पहारा ठेवला त्यामुळे जे आले ते आले. त्यांना आता बाहेरही पडता येईना या आणि अशा अनेक कठोर उपाययोजनांमुळे अद्यापही नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. त्यामुळेच नंदुरबार जिल्ह्यातील मोलमजुरांना कोरोनाचे नव्हे तर पोटाची खळगी भरण्याची खऱ्या अर्थाने चिंता आहे. आदिवासी डोंगर दऱ्यातील वाड़्या पाड्यातला माणुस दिवसभर आपल्या शेतात राबुन पोटाला मिळेल इतकच पिकवत असल्याने त्याला बाहेर पडण्याची गरचच पडत नाही. त्यामुळे कोरोनाची चिंताच नसल्याचे आदिवासी सांगतात. अनेकांना तर कोरोना काय हेही माहीत नाही. शहरात या नावाची काही तरी मोठी बिमारी आली अस म्हणत यामुळे गावकडे कामबंद असल्याने उपासमार होत असल्याचे गावकरी सांगतात. गुजरात राज्यात गेलेले अनेक औद्योगिक वसाहतीमध्ये तर अनेक शेतीत मोलमजुरी करत होते. त्यामुळे दिवसाकाठी आलेल्या शे दिडशे रुपयात घरातला चुला तर जळत होता. मात्र गावाकडे परतल्यानंतर आता काम नसल्याने या मोल मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जगावे तरी कसे असा प्रश्न त्यांना पडला आहे. शासनाने प्रती व्यक्ति पाच किलो धान्याची घोषणातर केली मात्र ते मिळणार तरी कधी असा प्रश्न आदिवासी बांधवांना पडत आहे.
आदिवासी विकास विभागाने आदिवासींसाठी सुरु असलेली खावटी कर्ज योजना देखील बंद केल्याने आता पैसै देणार कोणा हा प्रश्न त्यांना पडला आहे. शहरात एकीकडे दानशुरांचा ओघ सुरु असतांनाच गावाकडे आणि वाड्या पाड्यात भुक्या तिस्या आदिवासी बांधवांना अद्यापही एकहीजण विचारायला आलेली नसल्याची खंत गावकऱ्यांना आहे. त्यामुळे आगामी काळ फार कठीण दिसत आहे. अंन्नाच्या दाणां आणि दाण्यासाठी तरसावे लागणार अशीच भिती वयोवृद्ध आदिवासी बांधव व्यक्त करत आहे. त्यामुळे शहरांची व्यवस्था लावुन झाली असेल तर मायबाप सरकारने आमच्या रेशनचा तेवढ पहा एवढीच आर्त हाक आदिवासी बांधव सध्या तरी देतांना दिसत आहे.








