नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अगदी काही दिवसांपुर्वी जालना येथे काम करणारे मजूर भुसावळकडे चालत प्रवास करत असताना थकून रुळावर झोपल्याने त्यांच्या अंगावरून मालगाडी गेल्याने 16 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनं सर्वत्र हळहऴ व्यक्त केली जात होती. औरंगाबादजवळील करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात पहाटे सव्वा पाचच्या सुमारास घडला होता. दरम्यान सदरील घटनेवर जनहित याचिका दाखल करण्यात आल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. मात्र न्यायालयानं या खटल्याची सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार कामगार जर ट्रॅकवर झोपी गेले तर काय केले जाऊ शकते? ज्यांनी चालण्यास सुरवात केली आहे त्यांना कसे थांबवायचे, असा सवाल त्यांनी सरकारला केला. त्यास उत्तर म्हणून सरकारकडून सांगण्यात आले आहे की प्रत्येकाच्या घरी परतण्याची व्यवस्था केली जात आहे. असं सरकारकडून सांगण्यात आलं.

कोरोना व्हायरस संकटाच्या काळात संपुर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलंय. यादरम्यान अनेक प्रवासी, कामगार ठिकठिकाणी अडकून पडले आहे. या लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित कामगारांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे. सरकार या स्थलांतरित नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतांना काही कामगार सरकारच्या सूचनेकडे कानाडोळा करून पायीच आपल्या गावी निघाले आहेत.







