नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात एकीकडे कोरोनाचा हाहाकार सुरु आहे तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या विषयावर चर्चा होताना दिसत आहे. त्यातच आता जागतिक आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले असताना आता भारताला जागतिक स्तरावर जगातील तिसऱ्या सर्वोच्च अर्थव्यवस्थेवर नेण्याचे आमचे ध्येय असल्याचे वक्तव्य केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केले आहे.
येत्या काळात भारताला अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगातल्या सर्वोच्च तीन देशांच्या क्रमवारीत आणणे हे मोदी सरकारचे लक्ष्य आहे असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे. उत्तराखंड जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. भारताची अर्थव्यवस्था २०१३ मध्ये ९ व्या स्थानावर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या पाच वर्षांमध्ये ती पाचव्या क्रमांकावर आणली असेही राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे.
सध्याच्या घडीला असे अनेक विकसनीशल देश आहेत ज्यांना करोना नावाच्या संकटाचा फटका बसला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रकारे ही परिस्थिती हाताळली त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचं संकट हे एक आव्हान म्हणून स्वीकारले. या आव्हानाशी लढा देताना जी पावले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचलली आहेत त्याचे कौतुक फक्त भारतालाच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेला म्हणजेच WHO लाही आहे असंही राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे.