मुंबई (वृत्तसंस्था) – लॉकडाऊनमुळे अचानकपणे ठप्प झालेले जनजीवन… एकाकीपणा…विविध माध्यमातून सातत्याने सांगितली जाणारी करोनाविषयक माहिती…धास्तावणारी आकडेवारी आणि एकूणच वाढत चाललेले गंभीर वातावरण याचा परिणाम नागरिकांच्या मानसिक स्वास्थावर होत आहे. नैराश्य, भीती, चिंता अशा मानसिक समस्यांनी ग्रासलेल्या नागरिकांकडून समुपदेशनाचा पर्याय अवलंबला जात असून, दिवसभरातून सुमारे 150 नागरिकांकडून सद्य:स्थितीत समुपदेशनाबाबत विचारणा केली जात आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि पोद्दार फाउंडेशनच्या वतीने मोफत समुपदेशन हेल्पलाइन सुरू केली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती या चार भाषांमध्ये सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत या हेल्पलाइनवर संपर्क करता येतो. ही सुविधा मोफत असून स्त्री पुरुष कुणीही संपर्क करू शकतात. या हेल्पलाइन क्रमांकावर प्रशिक्षित समुपदेशकांशी संवाद साधता येतो. लॉकडाऊनच्या काळात मानसिक स्वास्थ्य जपणे या हेतुने सदर हेल्पलाइन सुरू केली आहे.याबाबत राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव अस्था लोथर म्हणाल्या, ‘अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात अस्थिरता निर्माण झाली आहे. साहजिकपणे याचा परिणाम नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्यावर होत आहे. वयोवृद्ध नागरिक, स्त्रिया अशा विविध स्तरातील नागरिकांकडून या हेल्पलाइनवर संपर्क साधला जातो. यामध्ये प्रामुख्याने नैराश्य आणि भीतीने ग्रस्त असलेल्या नागरिकांचा समावेश आहे. या माध्यमातून अनेकांचे समुपदेशन केले जाते, तर काहींना वैद्यकीय सहायता, पोलिसांची मदतदेखील पुरविली जाते.’ लॉकडाऊन काळात अनेक कुटुंबांमध्ये घरगुती वाद होत आहेत, तर काही ठिकाणी लहान मुलांवर अत्याचाराच्या घटनाही घडत असल्याचे काही फोन कॉल्समधून समोर येत आहे. अशा परिस्थितीत आयोगातर्फे पोलिसांची मदत घेत, त्या घटनांबाबत कारवाईदेखील केली जात आहे. मात्र, अनेकवेळा समुपदेशनाने बराचशा तक्रारींचे निवारण होत असल्याचेही दिसून येत असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले.महिला आयोगाकडे येणाऱ्या बहुतांश तक्रारी या टपालाद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटीतून येत असतात. मात्र सध्या टपाल सेवा बंद आहे. तसेच संचारबंदी असल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्यात बंदी आहे. त्यामुळेच आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण घटले असल्याचे आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.