जेरुसलेम:(वृत्तसंस्था) – इस्रायलमध्ये आपत्कालिन आघाडी सरकार स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. संसदेचे सभापती बेनी गांझा यांनी पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्याबरोबर आपत्कालिन आघाडी सरकार स्थापन करावे यासाठी 48 तासांची मुदत देण्यात आली आहे. इस्राईलचे अध्यक्ष रेवन रिवलीन यांनी गांझ यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर अशा प्रकारे अंशतः मुदत देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. गांझ यांना सरकार स्थापन करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली गेली होती. ही मुदत समाप्त झाल्यावर आता संयुक्त आघाडी सरकार स्थापन करण्याच्या शक्यतेची चाचपणी केली जात आहे. गांझ यांची ब्लू ऍन्ड व्हाईट आघाडी आणि नेतान्याहू यांची लिकूड पार्टीने संयुक्तपणे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये दोन्ही पक्षांमधील थेट चर्चेत समाधानकारक प्रगती होत असल्याचे म्हटले आहे. 2 मार्च रोजी झालेल्या निवडणूकांमध्ये कोणताही निश्चित निकाल लागू शकलेला नव्हता. त्यानंतर आघाडी सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नांना यश आलेले नाही.








