अकोला (वृत्तसंस्था) – जगभरात सध्या सर्वत्र कोरोनाचा धसका बसलेला आहे. अशातच अकोल्यात कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. शासकीय रुग्णालयातील कोरोना आयसोलेशन वार्डात या संशयित रुग्णावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. मुळ अकोल्यातील रहिवासी असलेली (२४ वर्षीय) तरुणी जर्मनीला नोकरीसाठी गेली होती. दोन दिवसांपूर्वी ती जर्मनीवरुन भारतात पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. यानंतर ती थेट अकोल्यात पोहोचली. घरी आल्यावर तरुणीला ताप येण्यास सुरुवात झाली.
प्रकृती खालावत असल्याने आपल्याला कोरोनाची लागण तर झाली नाही ना? असा संशय आल्याने तरुणीने थेट शासकीय रुग्णालयातील कोरोना आयसोलेशन वार्डात धाव घेतली. डॉक्टरांना कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्याने तरुणीवर उपचारास सुरु केले आहेत. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून प्राथमिक उपचार सुरू आहे. दरम्यान, रुग्णाच्या घशातील श्वासाचे नमुने घेण्यात आले आहेत. हे नमुने तपासणीसाठी तत्काळ पुण्याला पाठवण्यात आले आहेत. नमुन्यांचा तपासणी अहवाल येण्यास दोन दिवसांचा अवधी लागणार आहे. अहवाल आल्यानंतर पुढील उपचार सुरू करण्यात येणार आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरस संदर्भात भारत सरकारने दिलेल्या निर्देशानुसार जर्मनीहून परतलेली तरुणी संशयित नसून तिच्यावर पाळण ठेवण्यासाठी तिला आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. दरम्यान, अकोल्यात संशयित कोरोना रूग्ण म्हणून २४ वर्षीय तरुणीची ओळख व केस पेपर लिक करून व्हायरल करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करावी, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.