नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जम्मू-काश्मीर प्रशासनाने माजी आयएएस अधिकारी आणि जम्मू काश्मीर पीपुल्स मूव्हमेंट पार्टीचे संस्थापक शाह फैसल यांच्या नजरकैदेत 3 महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत फैसलला नजरकैदेत ठेवण्यात आले होते त्यातच वाढ करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
जम्मू काश्मीरचे कलम ३७० रद्द केल्यानंतर फैसल यांना ताब्यात घेण्यात आले होते आणि त्यांना आमदार वसतिगृहात ठेवण्यात आले होते. यावर्षी 15 फेब्रुवारी रोजी त्यांच्यावर पीएसए अंतर्गत कारवाई करण्यात आली. बुधवारी त्याच्यावरील पीएसए संपुष्टात येत होता. प्रशासनाने यापूर्वीच पीएसएला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे.
सार्वजनिक सुरक्षा कायद्यात दोन विभाग आहेत. एक सार्वजनिक सुव्यवस्था आणि दुसरा राज्याच्या सुरक्षेस धोका. सध्या फैसलच्या अटकेची मुदत 3 महिन्यांसाठी वाढविण्यात आली आहे. नंतर ते एक वर्षासाठी आणि त्यानंतर 2 वर्षांसाठी वाढविले जाऊ शकते.
फैसलला इस्तंबूलला जाण्यासाठी १३ आणि १४ ऑगस्टला जाण्यापासून रोखण्यात आले होते. यानंतर ते श्रीनगरला परत आले. त्याला तेथे नजरकैदेत ठेवले होते. भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकारी शाह फैसल यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि जम्मू काश्मीर पीपल्स मूव्हमेंट नावाची पार्टी स्थापन केली. गेल्या महिन्यातच जम्मू-काश्मीर प्रशासनाने माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्यावरील नजरकैद हटवली आहे.