नवी मुंबई (वृत्तसंस्था) – गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गेलेल्या तरूण डॉक्टरला त्याचे प्राण गमवावे लागले आहेत. आयुष शर्मा हा 24 वर्षीय डॉक्टर इंडेक्स मेडिकल महाविद्यालयाच्या मुलींच्या वस्तीगृहामध्ये राहणार्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी जात होता. त्यासाठी त्याने पाईप्सचा वापर केला. पाईपवर चढल्यानंतर चौथ्या मजल्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला. आयुषने याच महाविद्यालयामध्ये एमबीबीएसची पदवी घेतली होती आणि आता त्याची इंटर्नशीप सुरू होती. त्याची गर्लफ्रेंड देखील इंटर्नशीप करत होती, काही दिवसांपूर्वीच ती गावाहून हॉस्टेलवर परतली होती.
आयुषची प्रेयसी गावावरून परतल्यानंतर तो तिला भेटण्यासाठी आग्रह करत होता. दुसर्या दिवशी सकाळी भेटण्याबाबत तिने विचारले असता आयुषने त्याला नकार दिला आणि तो रात्री 2.30 वाजताच तिला भेटण्यासाठी मुलीच्या वस्तीगृहापर्यंत पोहोचला. पाईपच्या साहाय्यानेच तो वस्तीगृहाच्या छतावर पोहोचला, तिथून उतरण्याचा काही पर्याय नव्हता कारण खाली जाण्यासाठीचा दरवाजा बंद होता.
शेवटी त्याने प्लास्टिक पाईपच्या मदतीने गर्लफ्रेंडच्या खोलीजवळ जाण्यास सुरुवात केली. केवळ 2 इंचाचा पाईप त्याला सांभाळू न शकल्याने तिथून पडून त्याचा मृत्यू झाला. आयुष चौथ्या मजल्यावरून कोसळला मात्र कोणालाही त्याचा आवाज ऐकू आला नाही. पाईप तुटल्यामुळे पाणी जमा झाल्याचे त्याठिकाणी असलेल्या महिला गार्डच्या लक्षात आले. तेव्हा त्यांना आयुष पडल्याचे दिसले. आयुषला खाजगी रुग्णालयात भरती केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.