नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सर्वोच्च न्यायलयाने बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बहुमत चाचणीपुर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. मी माझ्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवत आहे, असे सांगत या पेचप्रसंगाला भारतीय जनता पक्ष जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्षाने जनादेशाची हत्या केल्याचा आरोप करून कमलनाथ म्हणाले, हे सरकार अस्थीर करण्यासाठी भाजपा नेहमी प्रयत्नशील होते. गेल्या 15 महिन्यात आमच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. हा माझा नव्हे तर साडेसात कोटी जनतेचा विश्वासघात आहे. त्यांनी जनतेने दिलेल्या आदेशाची हत्या केली आहे, असे सांगून ते म्हणाले. आमदारांना बंगळुरूमध्ये बंदी बनवून ठेवले होते, त्यामागचे सत्य देशातील जनतेने पाहिले आहे. हे सत्य लवकरच बाहेर येईल. जनता त्यांना माफ करणार नाही, असे ते म्हणाले. तत्पुर्वी शुक्रवारी अधिवेशन बोलावून बहुमत चाचणी दुपारी पाच वाजेपर्यंत घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांना दिले. त्यानंतर काही वेळातच विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर 16 आमदारांचे राजीनामे मंजूर केले. त्यामुळे कॉंग्रेसचे विधानसभेतील बळ 108 वरून 92 वर आले. तर दुसऱ्या बाजूला सभागृहात भाजपाचे 107 सदस्य आहेत. राज्यपालांपुढे त्यांनी 106 आमदारांना सोमवारी हजर केले होते. त्यांचा एक आमदार नारायण त्रिपाठी हा त्यावेळी अनुपस्थित होता. तो कॉंग्रेस आमदारांसोबत दिसले होते. सभागृहात सपा (1), बसपा (2) आणि अपक्ष (4) यांनी कॉंग्रेसला सत्तास्थापनेच्यावेळी पाठींबा दिला होता. सभागृहात बहुमतासाठी 104 आमदारांची आवश्यकता आहे.