पुणे (वृत्तसंस्था) – पुणे शहर आणि वाघोली गावाच्या हद्दीजवळ असणाऱ्या कावडे वस्तीमध्ये एका ५० वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस कर्मचाऱ्याला नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या घरातील व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे त्याच्या संपर्कात आलेल्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने क्वारंटाइन करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या घराचा परिसर व वस्ती वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी करून सील करण्यात आले आहे.
वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कावडे वस्ती परिसरामध्ये सर्व्हे करण्यात येणार आहे. कोरोनाची लागण झालेला पोलीस कर्मचारी पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असून वाघोली हद्दीमध्ये वास्तव्यास आहे. लक्षणे आढळल्यानंतर कोरोनाची तपासणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे.







