मुंबई (वृत्तसंस्था) – अंतिम वर्षाच्या परिक्षावरून सुरू असलेल्या विद्यार्थांमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तरुणांचे भविष्य वाचवण्यासाठी सरकारचे संकटमोचन संजय राऊत तुम्हीच धावून या, अशी उपहासात्मक टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

आशिष शेलार म्हणाले कि, करोनामुळे भयभीत विद्यार्थी, पालकांचा धोक्यात आलेला नोकरी-धंदा..त्यात सरकारचा ‘गोंधळात गोंधळ’..दुर्दैवाने विद्यार्थी तणावात..आता तरुणांचे भविष्य वाचवण्यासाठी ‘सरकारचे संकटमोचन’ संजय राऊत तुम्हीच धावून या! चला तरुणांचे भविष्य वाचवू या! अन्यथा संघर्ष करावाच लागेल, असे त्यांनी म्हंटले आहे.
मुख्यमंत्री म्हणतात, परिक्षांपेक्षा शिक्षण महत्त्वाचे पण शाळा कशा व कधी सुरु होणार? माहित नाही. मा. मुख्यमंत्री जाहीर करतात, अंतिम वर्षे पदवी परिक्षा रद्द, पण अद्याप लेखी आदेश नाही. त्यामुळे विद्यापीठांत परिक्षांची तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री परिक्षा रद्द केल्याचे जाहीर करतात तर वैद्यकीय शिक्षणमंत्री परिक्षा घ्या म्हणून राज्यपालांना जाऊन भेटतात. बार कौन्सिल ऑफ इंडिया म्हणते परिक्षा घ्यावीच लागेल. कुलपती म्हणून राज्यपालांना काहीच अवगत केले जात नाही, असेही आशिष शेलार म्हणाले आहेत.
तसेच पदवी अंतिम वर्षाला सरासरीवर गुण देऊन तब्बल 40% म्हणजे ATKT असलेल्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थी नापास करण्याचे हे षडयंत्र? तरुणांची एक पिढी उध्वस्त करण्याचे हे षडयंत्र? उच्च शिक्षणमंत्री म्हणतात योग्य वेळी निर्णय घेऊ? अशी टीका शेलारांनी सरकारवर केली आहे.







