मुंबई (वृत्तसंस्था) – एकदिवसीय तीन सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला आहे. मात्र, करोना विषाणूंचा धोका असल्याने प्रत्यक्ष सामन्यात त्यांनी कोणालाही शेकहॅण्ड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोणताही सामना झाल्यानंतर खेळाडू, प्रशिक्षक तसेच सपोर्ट स्टाफ एकमेकांशी हस्तांदोलन करतात व खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवितात. दक्षिण आफ्रिका संघानेच नव्हे तर गेल्या सप्ताहात इंग्लंड संघानेही दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शेकहॅण्ड करणार नसल्याचे ठरविले होते. भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला येत्या गुरुवारपासून (12 मार्च) प्रारंभ होत आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी करोनाच्या भीतीमुळे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंशी शेकहॅण्ड करण्यास नकार दिल्याने ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी टीका केली आहे. शेकहॅण्ड केल्याने या विषाणूंची लागण होणार आहे का, अशी विचारणा करत आमच्याकडे चांगल्या दर्जाचे सॅनिटायझर आहेत, अशा शब्दांत लॅंगर यांनी टोमणा मारला आहे.