जळगाव (प्रतिनिधी) – नक्षल प्रभावित क्षेत्रात तीन वर्षे खडतर सेवा बजावल्या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसदलातील 1 हजार 172 अधिकारी, कर्मचाऱ्यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झाले असून एमआयडीसी पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक संदीप हजारे आणि उपनिरीक्षक संदीप पाटील यांचा यात सहभाग आहे.
जिवाची परवा न करता अहोरात्र सेवा
सहाय्यक निरीक्षक संदीप हजारे : मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील सरुड-शाहूवाडी येथील संदीप अशोक हजारे वर्ष-2010 मध्ये महाराष्ट्र पोलिसदलात दाखल झाले. उपनिरीक्षकाच्या ट्रेनिंगनंतर त्यांनी 2016 ते 19 पर्यंत नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्यात झिंगाणपुर (ता. सिरंजा) आणि आहेरी पोलिस ठाणे अंतर्गत कर्तव्य बजावले. नक्षली परिसरात पेट्रोलिंग सहित, उपाय योजना आणि सुरक्षेसाठी जिवाची परवा न करता अहोरात्र सेवा बजावली. सलग तीन वर्षे काम केल्यावर गतवर्षीच त्यांची जळगाव जिल्ह्यात बदली झाली असून एमआयडीसी पोलिस ठाण्यात ते कार्यरत आहेत. कोरोना महामारीत बंदोबस्तासह जटिल गुन्ह्याच्या तपासात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.
अधिकाऱ्यांचे वाचविले जीव
उपनिरीक्षक संदीप पाटील :- मूळ मालपुर- शिंदखेडा (धुळे) येथील रहिवासी संदीप सुरेश पाटील 2014 मध्ये महाराष्ट्र पोलिस दलात दाखल झाले. उपनिरीक्षक पदाचे ट्रेनिंग आटोपल्यावर पहिलीच पोस्टिंग नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्यात झाली. (2015-18) असे तीन वर्षे त्यांनी खडतर सेवा बजावताना जिल्हा परिषद निवडणुकांत मन्नेराजाराम या मतदान केंद्राची जबाबदारी पार पाडत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चॉपर विमान उडवून देण्याची योजना नक्षल गटाने आखली असताना त्या विमानाचे रस्त्यावर आपत्कालीन लॅन्डींग करवून अधिकाऱ्यांचे जीव वाचवले होते. गडचिरोलीत उडालेल्या नक्षल विरोधी चकमकीत एका नक्षलीचा खातमा करण्यात आला होता. नक्षल प्रभावित सुरजागड येथे अतिरक्यांनी 76 वाहने आणि मोबाईल टॉवर उडवून दिले होते. परिणामी दहशतीत असलेल्या ग्रामस्थांच्या मदतीसाठी येथे (येलकीट पोस्ट निर्मिती) पोलिस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली, व्यसन मुक्ती अभियान राबवले, त्या सोबतच नक्षलींच्या आत्मसमर्पणासह शस्त्र संधी घडवून आणण्यात मोलाची कामगिरी त्यांनी बजावली. 2018 मध्ये जळगाव जिल्ह्यात बदलीनंतर एमआयडीसी पोलिस ठाणे अंतर्गत कुसुंबा गाव व्यसन मुक्त केले. त्यांना पोलिस महासंचालक विशेष सेवा पदक, हैदराबाद येथे ग्रेहाऊस पदक, जंगल नॅशनल कमांडो पदक मिळालेले आहेत.