मुंबई (वृत्तसंस्था) – विधानपरिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. काँग्रेसने आपले दोन उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर होत आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर उद्धव ठाकरे संतापले आहेत. काँग्रेसने उमेदवार मागे घेतला नाही तर मी निवडणूक लढवणार नाही, असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब थोरात यांना पाठवला आहे. सहाव्या जागेवरून महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाल्याचं पाहयला मिळत आहे.
सहा जागा लढवण्याबाबत काँग्रेस अजूनही ठाम आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दुसऱ्या उमेदवारांची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत चिंता वाढलीय. दरम्यान शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी रात्री 10 च्या सुमारास बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही थोरातांना उमेदवार मागे घेण्यासाठी केला संपर्क असल्याची सूत्रांची माहिती आहे. सहाव्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निरोप पाठवला.