मुंबई (वृत्तसंस्था) – विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून दोन नावांची घोषणा झाली आहे. अपेक्षेप्रमाणे साताऱ्याचे शशिकांत शिंदे आणि अकोल्याचे अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. आता चारही प्रमुख पक्षांनी केलेल्या घोषणेनुसार विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी दहा उमेदवार सध्यातरी मैदानात आहेत. नावं घोषित झाली असली तरी अजून भाजप वगळता अन्य पक्षांच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला नाही. तसेच निवडणूक बिनविरोध करण्यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळं कुण्या एका उमेदवाराने माघार घेतल्यानंतरच निवडणूक बिनविरोध होईल. उद्या महाविकास आघाडीकडून किती जण अर्ज भरणार यानंतर चित्र स्पष्ट होईल. जर महाविकास आघाडीतील कुणी माघार घेतली नाही तर मात्र 21 तारखेला निवडणूक होईल हे निश्चित आहे.