पुणे (वृत्तसंस्था) – खा. उदयनराजे भोसले यांच्या वतीने शुक्रवारी गरजू व्यक्ती व कुटुंबांना चाळीस पोती धान्यवाटप करण्यात आले. जलमंदिरात उदयनराजेंच्या हस्ते हा वाटप कार्यक्रम करण्यात आला.
उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने आयोजित धान्य वाटप कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेण्यात आली होती. लॉकडाऊन सुरू असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, हातावर पोट असणारे छोटे मोठे विक्रेते, पारधी जमातीचे लोक, परप्रांतीय कामगार व दारिद्रय रेषेखालील कुटुंबे यांची जीवनावश्यक वस्तू व रेशनिंगअभावी परवड सुरू आहे.
पुरेसे अन्न नसल्यामुळे या गरजू कुटुंबांना हलाखीचे दिवस आहेत. याची माहिती खा. उदयनराजे भोसले यांना समजल्यावर उदयनराजे यांनी सातारा व जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांशी संपर्क करून धान्यसाठा उपलब्ध केला. दररोज दहा कुटुंबांना सोशल डिस्टन्सिंग राखून पाच किलो, तीन किलो या प्रमाणात गहू व तांदूळ याचे वाटप केले जात आहे. शुक्रवारी उदयनराजे यांच्या हस्ते साताऱ्यातील कातकरी व दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, अडचणीतील व्यक्तींना मदतीचा हात दिला. यावेळी माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, बाळासाहेब ढेकणे, संदीप शिंदे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.