शिरसोली येथील ५५ वर्षीय शेतकरी कालपासून होते बेपत्ता; धरणाच्या काठावर आढळला रुमाल
जळगाव (प्रतिनिधी) – शिरसोली प्र. न. येथील कैलास हरि चव्हाण (मराठे) (वय ५५) यांचा नेव्हरे धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कैलास चव्हाण हे काल दुपारी १२ वाजेपासून गावातून बेपत्ता होते. शिरसोली-नेव्हरे शिवारात त्यांची शेती असून, काल ते शेतात गेले होते. त्यांच्या शेतापासून काही अंतरावर नेव्हरे धरण असल्याने ते धरणात पोहण्यासाठी गेले असावेत, असा अंदाज नातेवाइकांना आला. त्यानुसार शोध घेतला असता धरणाच्या काठाजवळ त्यांचा रुमाल आढळून आला. त्यामुळे नातेवाइकांची चिंता वाढली होती.

आज सकाळपासून कैलास चव्हाण यांचा मुलगा व नातेवाइकांनी नेव्हरे धरण परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. अखेर आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास धरणाच्या पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसून आला. मृतदेह कैलास चव्हाण यांचाच असल्याची खात्री झाल्यानंतर नातेवाइकांनी तातडीने गावातील पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना माहिती दिली. त्यानंतर मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला.
या घटनेची माहिती जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याला देण्यात आली असून, याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत. कैलास चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.








