जखमींपैकी ४ जण भुसावळ तालुक्यात परतले घरी
जळगाव (विशेष वृत्त) : नेपाळ बस दुर्घटनेतील काठमांडू येथील उपचार घेत असलेल्या तळवेल येथील इंगळे दाम्पत्याला गुरुवारी दि. २९ रोजी रात्री मुंबईत विमानाने आणण्यात आले आहे. तर चौघेजण आपल्या घरी भुसावळ व वरणगाव येथे परतले आहे. काठमांडू येथे आता ५ जण उपचार घेत आहे.
नेपाळ देशात देव दर्शनासाठी गेलेल्या भुसावळ तालुक्यातील भाविकांच्या बसला दरीत कोसळून अपघात झाला होता. यात २७ जण मृत्युमुखी पडले होते. तर १६ जण जखमी होते. १ तरुणी बेपत्ता आहे. या १६ पैकी ११ जण आता भारतात परतले आहेत. (केसीएन) त्यात बॉंबे हॉस्पिटल येथे वर्षा पंकज भंगाळे, कुमुदिनी झांबरे, निलिमा भिरुड हे भाविक तर ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल येथे अविनाश भागवत पाटील (वय ४८, रा. दर्यापूर, ता. भुसावळ) आणि शारदा सुरेश पाटील (वय ५०, रा. आचेगाव ता. भुसावळ) यांच्यासह तळवेल येथील सीमा अनंत इंगळे व अनंत ओंकार इंगळे हे उपचार घेत आहेत.

दुसरीकडे, हेमराज राजाराम सरोदे, रुपाली हेमराज सरोदे हे वरणगाव येथे तर भुसावळ येथे सुनील धांडे व भारती पाटील हे घरी परतले आहेत. तर तळवेल येथील सीमा अनंत इंगळे व अनंत ओंकार इंगळे या दाम्पत्याला गुरुवारी दि. २९ रोजी रात्री मुंबईत विमानाने आणण्यात आले आहे. यावेळी आ. संजय सावकारे, प्रशांत पाटील, गोलू पाटील, परीक्षित बऱ्हाटे, अतुल झांबरे उपस्थित होते.

भाविकांना उपचार मिळण्यासाठी राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाचे रामेश्वर नाईक हे सहकार्य करीत आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे रुग्णालयात लक्ष ठेऊन आहेत. अपघातातील उर्वरित जखमी आशा पांडुरंग पाटील, प्रवीण पांडुरंग पाटील यांच्यावर काठमांडू येथे जनरल कक्षात तर रेखा प्रकाश कोळी, ज्ञानेश्वर बोंडे, आशा बोन्डे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.








