जळगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांना संधी मिळणार असल्याचे आता निश्चित झालेले आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी झालेल्या व हॅट्रिक साधलेल्या रावेर लोकसभा मतदार संघातील खासदार रक्षा निखिल खडसे यांचा समावेश असून त्यांना राज्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे.
पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, शिवसेना शिंदे गटाचे चौथ्यांदा झालेले खासदार प्रतापराव जाधव , रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले यांना मंत्रीपद मिळणार आहे. नारायण राणे यांचा पत्ता कट झाल्याचे दिसून येत आहे.
रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे मध्यंतरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांचा अजून भाजप प्रवेश झाला नाही. मात्र, त्यांच्या सुनेला मंत्रीपद मिळत आहे. खडसे परिवार खासगी विमानाने दिल्लीला रवाना झाला आहे.
कोकण विभागातून पियुष गोयल, पश्चिम महाराष्ट्रातून रामदास आठवले आणि मुरलीधर मोहोळ, उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे, विदर्भातून नितीन गडकरी आणि प्रतापराव जाधव यांना मंत्रिमंडळात संधी मिळत आहे. तर मराठवाड्यातून या वेळेला कोणीही मंत्री नसणार आहे.