मुंबई – कोरोनाच्या कठीण काळानंतर आता लोकांनी दिवाळीचं मोठं उत्साहात स्वागत केलं आहे. कारण, धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याची विक्री 30 टक्क्यांनी अधिक झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये दिवाळीच्या उत्सवात लोकांनी 20,000 कोटी रुपयांच्यां सोन्याची खरेदी केली आहे. च्या आकडेवारीनुसार, देशभरात धनत्रयोदशीच्या दिवशी तब्बल 40 टन सोन्याची विक्री झाली, ज्याची किंमत 20,000 कोटींच्या घरात आहेत.

आयबीजेएचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी सुमारे 12,000 कोटी रुपये सोन्याची विक्री झाली होती. पण या वर्षी कोरोनासारख्या कठीण काळातही हा आकडा 20,000 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी 30 टन सोनं विकलं गेल्याची माहिती आहे. तर यंदा 40 टन सोन्याची विक्री झाली असल्याची माहिती सुरेंद्र मेहता यांनी दिली आहे.
ते म्हणाले की, ‘गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या विक्रीत 30 ते 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर किंमतीत सुमारे 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे.’ इतकंच नाही तर कोरोनामुळे आर्थिक अडचण असतानाही ऐवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी कशी झाली असा प्रश्न सगळ्यांनाच असेल. पण गेल्या काही महिन्यांपासून सोनं खरेदी बंद होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांनी खरेदी केली आहे अशी माहितीही मेहता यांनी दिली. इतकंच नाहीतर लॉकडाऊन असल्यामुळे व्यापार ठप्प होता. पण आता मोठ्या उत्साहात मार्केट सुरू झालं आहे. अशात लग्न सराईचे दिवस आहेत. त्यामुळे सोनं खरेदीला यंदा लोकांनी जास्त पसंती दिली आहे.
दरम्यान, सोन्याच्या किंमतींनी 56,000 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. त्यानंतर आता पुन्हा भाव खाली येताना दिसत आहेत. पण कोरोनामुळे, किंमत पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आताच लोकांनी सोनं खरेदीकडे कल दिला. यासोबतच यावर्षी गुरुवारसह दोन दिवस देशाच्या अनेक भागांमध्ये धनत्रयोदशी साजरा केला गेला. यामुळे सोनं खरेदीसाठी लोकांना आणखी वेळ मिळाला.







