पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
भूजल विभागाने यंदाही १ हजार ४८७ गावांतील २ हजार ५०७ जलस्रोतांची तपासणी केली, ज्यात १७१ गावांमधील २०५ जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावर गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता भोगावडे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. त्यांनी तत्काळ उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘शुद्ध पाणी, सुरक्षित आरोग्य हे शासनाचे धोरण आहे. दूषित जलस्रोतांचे पुन्हा नमुने घेऊन तातडीने परीक्षण करावे. १०७ गावांमधील २०५ जलस्रोत बंद करून पर्यायी पाणीपुरवठा सुनिश्चित करावा.” तसेच, पाणीपुरवठा टाक्या आणि जलस्रोतांचे निर्जंतुकीकरण करून परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश दिले. ग्रामपंचायतींनी टीसीएलचा वापर करून पाणी शुद्ध करण्यावर प्राधान्य देण्याची सूचना केली. शेतकऱ्यांनी नायट्रेट प्रदूषण कमी करण्यासाठी पारंपरिक युरियाचा कमी वापर करून नॅनो युरियाचा वापर वाढवावा, असेही पाटील यांनी सांगितले.