पारोळ्यात आठ बंडल जप्त
पारोळा ( प्रतिनिधी ) – मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पारोळा शहरात नायलॉन मांजाच्या विक्री व साठवणुकीविरोधात पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली असून, या कारवाईत एका तरुण विक्रेत्यावर गुन्हा दाखल करून प्रतिबंधित नायलॉन मांजाचे आठ बंडल जप्त करण्यात आले आहेत. शहरात नायलॉन मांजा सर्रास विक्री केला जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळत होत्या.

या पार्श्वभूमीवर पारोळा पोलिसांनी विशेष गस्त व धडक मोहीम सुरू केली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस पथकाने पाठक गल्ली परिसरातील एका घरावर छापा टाकला. ही कारवाई हवालदार सुनील पवार, सुनील पाटील, प्रवीण बोरसे आदी गस्त घालत असताना करण्यात आली. छाप्यात ज्ञानेश्वर एकनाथ भोई (वय १९) हा तरुण नायलॉन मांजा विक्री करताना व साठवणूक करताना आढळून आला. त्याच्याकडून एकूण २,४०० रुपयांचे आठ नायलॉन मांजाचे बंडल जप्त करण्यात आले. या प्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.








