एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील रामेश्वर कॉलनी परिसरात प्रतिबंधित नायलॉन मांजाची चोरटी विक्री करणाऱ्या एका इसमास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई मंगळवार, दि. ३० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुंडलीक धनके यांना गोपनीय बातमी मिळाली होती. रामेश्वर कॉलनीतील साई गजानन अपार्टमेंट येथे एक इसम प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या घरात साठवून ठेवत आहे. सदर माहितीची खातरजमा करून संबंधित इसमावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांनी दोन पंचांना बोलावून घेतले. त्यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकुर, किरण पाटील, राहुल घेटे व गणेश ठाकरे हे खाजगी वाहनाने रामेश्वर कॉलनी परिसरात रवाना झाले. साई गजानन अपार्टमेंटजवळ वाहन उभे करून सर्वजण पायी वरच्या मजल्यावर गेले असता, एका घरात एक इसम हातात कापडी थैली घेऊन बसलेला दिसून आला.
पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांनी पंचांसमक्ष सदर इसमास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने नाव विनोद विजय दराडे (वय-४४वर्षे, रा. साई गजानन अपार्टमेंट, रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे सांगितले. त्याच्या ताब्यातील कापडी थैलीची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजाचे १५ रिळ आढळून आले. प्रत्येकी सुमारे २ हजार रुपये किंमतीचे असे एकूण ३० हजार रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे रिळ जप्त करण्यात आले.
सदर प्रतिबंधित नायलॉन मांजाचा दोन पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करण्यात आला. आरोपी व मुद्देमाल ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील करीत आहेत.ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे व पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील, नितीन ठाकुर, गणेश ठाकरे व राहुल घेटे यांनी सहभाग घेतला.









