राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ आता दुतर्फा चकाकणार, स्वच्छतेसाठी जळगाव मनपा सज्ज !
जळगाव ( प्रतिनिधी ):- शहराच्या विकासात आणि स्वच्छतेत आता महापौर दीपमाला काळे यांच्या दूरदृष्टीने व प्रयत्नांनी आधुनिक तंत्रज्ञानाची भर पडली असून, जळगाव शहर महानगरपालिकेच्या ताफ्यात दाखल झालेल्या नवीन वाहनांचे आणि यंत्र सामग्रीचे भव्य लोकार्पण सोमवारी करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौर दीपमाला काळे यांनी अभिनव पद्धतीने उद्घाटन केले.

‘स्वच्छ जळगाव, सुंदर जळगाव’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील कचरा आणि वेस्ट मटेरियल आता आधुनिक जेसीबी मशीनद्वारे अवघ्या काही वेळात साफ केले जाणार आहे. या उपक्रमामुळे महामार्गाच्या स्वच्छतेसह वेळेची मोठी बचत होणार असून विकासकामांना नवी गती मिळणार आहे.
आकाशवाणी चौकात आयोजित या सोहळ्यात महापौर दीपमाला काळे तसेच उपमहापौर मनोज चौधरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ३ नवीन जेसीबी वाहनांचे उद्घाटन करण्यात आले. या मशीनद्वारे महामार्गावरील कचरा व वेस्ट मटेरियल ट्रॅक्टरमध्ये भरून साफसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यापूर्वी हे काम मनुष्यबळाद्वारे करावे लागत असल्याने वेळ जास्त लागत असे, मात्र आता मशीनच्या मदतीने हा राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे स्वच्छ करणे सोपे होणार आहे.
अग्निशमन दलाची शक्ती वाढली; ताफ्यात २ हायटेक वाहने
महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला अधिक सक्षम करण्यासाठी ६ प्रभावी वाहने आधीच दाखल झाली होती, त्यात आता आणखी २ अत्याधुनिक वाहनांची भर पडली आहे. यात वॉटर ब्राऊजर या वाहनाची क्षमता १२ हजार लिटर असून, दोन सामान्य वाहनांचे पाणी एकाच वाहनात मावते.ऍडव्हान्स मल्टीपर्पज फाउंटन मशीन यामुळे आपत्कालीन स्थितीत अतिशय कमी वेळात आग विझवणे शक्य होणार आहे.
या सोहळ्याप्रसंगी भाजपचे गटनेता प्रकाश बालाणी, शिवसेना शिंदे गटाचे गटनेता विष्णू भंगाळे, शिवसेना ठाकरे गटनेता इब्राहिम पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गटनेता प्रफुल्ल देवकर, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, सहाय्यक उपायुक्त उदय पाटील, अग्निशमन अधिकारी भारत बारी उपस्थित होते. तसेच माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक दीपक सूर्यवंशी, अरविंद देशमुख, निलेश तायडे, कविता पाटील, अंकिता पाटील, विजय बांदल, गायत्री राणे, जयश्री पाटील, ॲड. दिलीप पोकळे, पियुष कोल्हे, गणेश सोनवणे, कल्पेश सोनवणे, सुरेखा तायडे, आशा पाटील, नरेंद्र राजपूत, रेशमा काळे, अनिल अडकमोल यांसह विविध पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









