नवी दिल्ली (वृत्तसंथा) – दिल्लीच्या निर्भया प्रकरणातील दोषी 4 दोषींपैकी एक पवनची क्युरेटिव्ह पेटिशन सुप्रीम कोर्टाने सोमवारी फेटाळून लावली आहे. पवनने फाशीला जन्मठेपेत बदलण्याची विनंती केली होती. पवनचे वकील एपी सिंह यांनी रविवारी म्हटले होते, की हे प्रकरण मृत्यूदंडाशी संबंधित आहे. त्यामुळे याचिकेवर खुल्या कोर्टात सुनावणी घेण्यात यावी. पतियाळा हाउस कोर्टाने तिसरे डेथ वॉरंट जारी करताना फाशीसाठी 3 मार्च ही तारीख ठरवली आहे.
तत्पूर्वी शनिवारी आणखी एक दोषी अक्षय सिंहने पतियाळा हाउस कोर्टात अपील केले होते, की 3 मार्चला होणारी फाशी थांबवण्यात यावी. त्यावर कोर्टाने तिहार तुरुंग प्रशासनाला नोटीस जारी करताना 2 मार्च पर्यंत उत्तर मागितले होते. अक्षयने याचिकेत म्हटले होते की त्याने राष्ट्रपतींकडे नव्याने दया याचिका पाठवली आहे आणि त्यावर अजुनही निर्णय झालेला नाही. अक्षयच्या वकिलांच्या मते, यापूर्वीच्या दया याचिकेत पूर्ण तथ्य नव्हते त्यामुळे ती याचिका फेटाळून लावण्यात आली होती.
कोर्टाच्या कारभाराने धक्का बसला निर्भयाच्या आई आशा देवी यांनी सुनावणी होण्यापूर्वी म्हटले होते, की “कोर्टाच्या निष्क्रीय कारभारामुळे मला धक्का बसला आहे. सारे जग बघतेय की नराधमांच्या वकिलांनी कसे कोर्टाची दिशाभूल करून फाशीची अंमलबजावणी होण्यात टाळा-टाळ केली. आता या नराधमांनी फाशीला दोन दिवस शिल्लक असताना पुन्हा याचिका मांडल्या आहेत. सुप्रीम कोर्टाला एवढा वेळ का लागतोय. निर्णय झालाच आहे, तर मग अंमलबजावणीसाठी वेळ का लागत आहे.