जळगाव (प्रतिनिधी)- जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या एका परप्रांतीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दीपक रंजन बिंदेश्वरसिंग (वय २५, रा. आधारपुर, राज्य बिहार, ह.मु. नशिराबाद) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दीपक रंजन हा त्याच्या मित्रांसोबत जळगाव तालुक्यातील भादली स्टेशनजवळ रेल्वे ट्रॅकवर कामासाठी नोकरीला होता.
बुधवारी सकाळी ९ वाजेच्या पूर्वी दीपकने आपल्या राहत्या घराचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. नेहमीप्रमाणे त्याचे मित्र त्याला कामावर जाण्यासाठी बोलावण्यासाठी रूमजवळ आले. त्यावेळी रूमचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काही नागरिकांच्या मदतीने दरवाजा उघडला असता, दीपकने गळफास घेतल्याचे दिसून आले.
या घटनेची माहिती तातडीने नशिराबाद पोलिसांना देण्यात आली. नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह खाली उतरवला आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मयत घोषित केले.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस कॉन्स्टेबल सागर बिडे हे करत आहेत.









