जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील नशिराबाद गावातील आठवडे बाजारात खरेदीसाठी आलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना शुक्रवारी दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. महिलेने नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
माधुरी प्रकाश वाणी (वय ६३, रा. नशिराबाद, ता. जळगाव) या परिवारासोबत नशिराबाद येथे राहतात. दर शुक्रवारी गावात मोठा आठवडे बाजार भरतो, जिथे परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी करतात. नेहमीप्रमाणेच माधुरी वाणी या देखील बाजारासाठी गेल्या होत्या. बाजारात खरेदी करत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळ काढला.
ही घटना घडल्यानंतर महिलेला काही काळ आपल्या दागिन्याच्या चोरीची कल्पना आली नव्हती. मात्र काही वेळानंतर गळ्यातील मंगळसूत्र गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्वरित शोध घेण्याचा प्रयत्न केला. बाजारातील काही लोकांना विचारले, परिसरात शोध घेतला, पण चोरट्याचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर त्यांनी रात्री ९.३० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार, नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल योगेश वराडे करीत आहेत.