रेल्वे जीआरपीएफची कारवाई, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त !
जळगाव (प्रतिनिधी) :- रेल्वे स्थानकावरून मनमाडला जाण्यासाठी निघालेल्या एका महिलेची दागिन्यांनी भरलेली पर्स लांबवणाऱ्या दोन संशयित चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने भुसावळ येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला सुमारे २ लाख ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या संदर्भात भुसावळ जीआरपी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील नर्स ज्योती प्रकाश भोसले (वय-३९) या ५ ऑगस्ट रोजी जळगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून मनमाडला जाण्यासाठी गोवा एक्सप्रेसमध्ये चढत होत्या. (केसीएन)त्यांची हॅन्डबॅग गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या पर्समध्ये सुमारे २ लाख ४१ हजार रुपये किमतीचे दागिने ठेवलेले होते. त्यांना नाशिक येथे जाण्याची घाई असल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दिली नव्हती. त्यानंतर भोसले यांनी रेल्वे पोलिसांना तक्रार दिल्यावर, रेल्वे पोलिसांनी जळगाव रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. या तपासणीतून दोन संशयितांना ओळखण्यात आले.
पोलिसांनी भुसावळ येथून आदित्य ज्ञानेश्वर कुमावत (वय १८, रा. भुसावळ) आणि असलम हाफिज शाह (वय १९, रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ) या दोघांना ताब्यात घेतले. हे दोघेही चोरी केलेले सोने भुसावळमध्ये विकण्याच्या तयारीत असतानाच त्यांना अटक करण्यात आली. रेल्वे पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.(केसीएन)ही कारवाई आरपीएफचे प्रभारी निरीक्षक अमित कुमार यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ध्यावकर, आरपीएफचे कॉन्स्टेबल विनोद जेठवे, मनोज मौर्य, पंकज वाघ, एन.एम. महाजन तसेच भुसावळच्या जीआरपी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली.