मुंबई (वृत्तसंस्था)- महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते खासदार ‘नारायण राणे’ यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः नारायण राणे यांनी सोशल मीडियावर ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण पुढचे काही दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहोत, असे सुद्धा राणे यांनी सांगितले आहे.

नारायण म्हणाले कि, ‘माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल.’ अश्या आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झालेले राणे कुटुंबातील नारायण राणे दुसरे सदस्य ठरले आहेत. यापूर्वी त्यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली होती.







