रेकॉर्डवर नसल्याने आल्या अडचणी, अमळनेर पोलीस स्टेशनची कामगिरी
अमळनेर (प्रतिनिधी) : – शहरासह इतर तालुक्यात दुचाकी चोरणाऱ्या रेकॉर्डवर नसलेल्या शनिमांडळ येथील सराईत गुन्हेगाराला अमळनेर पोलिसांनी अटक करून त्याच्याजवळून २ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. रेकॉर्डवरील नसल्याने त्याला शोधण्यात अडचणी येत होत्या.
लक्ष्मी नगर येथील अजिंक्य किरण पाटील यांची मोटरसायकल (क्र. एम एच १९ डी एच २३११) चोरी गेल्याची तक्रार अमळनेर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. सततच्या मोटरसायकल चोऱ्यामुळे आरोपी शोधण्यासाठी पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे, प्रशांत पाटील, उज्वल म्हस्के, विनोद संदानशीव, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, गणेश पाटील यांचे पथक रवाना केले होते.
पोलिसांनी घटनस्थळापासून सीसीटीव्ही फुटेज तपासून गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढली असता संशयित आरोपीपर्यंत पोहचले. नंदुरबार येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव धनंजय उर्फ भूषण काशीनाथ कुवर (वय ३१, रा. तरवाडे पोस्ट, शनिमांडळ) येथील असल्याचे सांगितले. त्याच्याजवळून चोरीस गेलेली दुचाकी ताब्यात घेतली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दोंडाईचा येथे देखील मोटरसायकल चोरी केल्याचे सांगितले.
हा गुन्हेगार अजून रेकॉर्डवर नसल्याने पोलिसांना आढळून येत नव्हता. अमळनेर व दोंडाईचा येथील मोटरसायकल मालकांना त्यांच्या मोटारसायकली परत करण्यात आल्या आहेत. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करत आहेत.