जळगाव (प्रतींनिधी) – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यासह जिल्हाभरातील बससेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता अनलॉक प्रक्रियेत बससेवा सुरू करण्यात आली. मात्र इतरत्र बससेवा सुरू झाली असूनही जळगाव तालुक्यातील नंदगाव परिसरात बसफेऱ्यांची वणवण होती. यामुळे जळगाव नंदगाव बससेवा पूर्ववत सुरु करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने नंदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल सोनवणे यांनी जळगाव बसस्थानक प्रमुखांना निवेदन देत केली होती. याची दखल घेत नंदगाव परिसरातील बससेवा नुकतीच पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. यामुळे परीसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नंदगाव परिसरात फेसर्डी, पिलखेडा, नांद्रा बु. कुवारखेडा, कानळदा, फुपनगरी, वडनगरी, खेडी व आव्हाणे आदी गावे आहेत. या भागातील नागरिकांची दळणवळण सुविधा प्रामुख्याने एसटी बसवरच अवलंबून असते. लॉकडाऊनमुळे या भागातील एसटी सेवा बंद करण्यात आल्याने या परिसरातील शेतकरी, किरकोळ विक्रेते व ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. नंदगाव परिसरातील कंपन्या व कारखाने तसेच नोकरीसाठी तसेच बाजारामध्ये विक्रीसाठी जाणारे शेतकरी, नोकरदार व ग्रामस्थांचे एसटी चालू झाली नसल्याने हाल होत होते. या भागातील अनेक नागरिक उदरनिर्वाहासाठी परिसरातील विविध ठिकाणी एसटीने ये-जा करत असतात. परंतु एसटी बंद असल्याने कामावर जाता येत नव्हते व खासगी वाहनधारकांकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट सुरु होती. यामुळे स्वप्निल सोनवणे यांनी याबाबतीत बस सुरू करण्यासाठी पाठपुरावा करत बसस्थानक प्रमुखांना निवेदनामार्फत मागणी केली होती. याची बसस्थानक प्रमुखांनी दखल घेत जळगाव नंदगाव बससेवा पूर्ववत सुरू केली आहे. यामुळे एसटी महामंडळाचे नंदगाव परिसरातील जनतेकडून आभार व्यक्त होत आहेत.
जळगाव – नंदगाव बससेवा वेळापत्रक –
जळगावहून सकाळी 6.30, 9.15, दुपारी 12.10 व संध्याकाळी 6.00 तर नंदगावहून सकाळी 5, 7.45, 10.30, दुपारी 1.30 वाजता बस आहे.
( फोटो – बसस्थानक प्रमुखांना निवेदन देत पाठपुरावा करताना स्वप्निल सोनवणे )